
पेत्राचे दुसरे पत्र याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
11/12/2025
ओबद्याच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
18/12/2025नहूम या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
नहूमचे पुस्तक वाचायला सोपे नाही. अश्शूराविरुद्धच्या न्यायनिवाड्याचा त्याचा संदेश दाखवतो की देव पापाला विजय मिळवू देणार नाही; तरीही निनवेच्या पतनाचा पुस्तकात केलेला उत्सव पूर्णपणे समजून घेणे, किंवा न्यायावर सातत्याने दिलेला भर सुवार्तेशी कसे जोडलेले आहे हे पूर्णपणे आकलन करणे कठीण असू शकते. या आणि इतर अनेक व्याख्यात्मक समस्यांकडे वाचकांनी खालील तीन गोष्टी लक्षात ठेवून पाहिले, तर त्यांना योग्य प्रकारे हाताळता येते.
1. सुवार्ता नहूमच्या संदेशासाठी संदर्भ तयार करते (नहूम 1:2–8).
नहूम 1:2–8 हा पहिला मुख्य विभाग निश्चितच नकारात्मक स्वराचा आहे. नहूम गृहीत धरतो की सर्व मानवजात केवळ अश्शूरीच नव्हेत (ज्यांचा या विभागात उल्लेखही नाही), देवाच्या परिपूर्ण न्यायासमोर उघडपणे उभे आहेत (नहूम 1:2–3, 5–6, 8). म्हणूनच ही अत्यंत आनंददायक सुवार्ता आहे की देव “संकटाच्या दिवशी आश्रयस्थान” आहे, जो त्याच न्यायापासून त्या लोकांना आश्रय देतो जे स्वतःला त्याच्या दयाळूपणावर सोपवतात (नहूम 1:7).
हा विभाग पुस्तकाच्या अगदी सुरुवातीला ठेवलेला असल्यामुळे, तो पुढे येणाऱ्या पुस्तकाच्या उर्वरित मजकुरासाठी एक व्याख्यात्मक किल्ली म्हणून कार्य करतो. यहूदाचे भूतकाळातील पाप, तिचे दुःख संपवण्याचा देवाचा कनवाळू निर्णय (नहूम 1:12), आणि अश्शूरावर कोसळणारे न्यायनिवाड्याचे वादळ, या सर्व गोष्टी न्यायनिवाडा आणि तारण या देवाच्या दुहेरी कार्याची प्रतिमाने आहेत. याशिवाय, नहूमच्या काळाच्या सुमारे एक शतकापूर्वी उत्तरेकडील इस्राएल राज्यासह प्राचीन निकट पूर्वेवरील अश्शूरच अजेय वर्चस्व दिसत असले तरी, देवाचा हस्तक्षेप हे उघड करेल की त्या साम्राज्याचे सर्वोच्चत्वाचे दावे खोटे होते, आणि त्यांच्या देवतांनीच ते वर्चस्व शक्य केले असा त्यांचा गर्वही तितकाच असत्य होता.
2. अश्शूर हा देवाचा अंतिम शत्रू नाही.
नहूम जरी अश्शूराला, विशेषत: त्याची राजधानी निनवे हिला, ठळकपणे दोषी ठरवत असला, तरी बहुतेक अश्शूरी लोक प्रत्यक्ष आक्रमणात सामील नव्हते, आणि त्यांच्या काही नागरिकांमध्ये असे इस्राएलीही होते ज्यांना त्यांनी याआधीच्या मोहिमांमध्ये जिंकून आपल्या राज्यात सामावून घेतले होते. खरेतर, हे पुस्तक सातत्याने अश्शूरच्या राजांवर (नहूम 1:11, 14), त्याच्या सशस्त्र दलांवर (नहूम 2 चा बहुतांश भाग), आणि त्यांच्याकडून केले जाणारे शोषण व स्व-गौरवाच्या धोरणात सामील इतरांवर लक्ष केंद्रित करते आणि हे उघड करते की देवाचा न्यायनिवाडा प्रामुख्याने त्यांच्यावरच पडणार आहे. एसाऱ्हद्दोन (इ.स.पू. 681–669 मध्ये राज्य करणारा) यांसारख्या सम्राटांना, ज्यांनी स्वतःला “जगाचा राजा… सर्व शासकांमध्ये अग्रगण्य” असे संबोधले आणि मार्डुक व नबू यांसारख्या “महान देवांवर” अवलंबून राहिले, प्रभू केवळ एवढेच म्हणतो, “तू नगण्य आहेस” (नहूम 1:14), आणि तसेच घडवूनही आणतो. अश्शूर-साम्राज्यावरचा देवाचा सूड हा प्रकटीकरण या पुस्तकातील “बाबेल” विरुद्धच्या त्याच्या न्यायनिवाड्याची आगाऊ झलक आहे; त्या “बाबेल” मध्ये केवळ रोमच नव्हे, तर त्याआधीचे बाबेल आणि निनवे, तसेच त्यानंतर येणाऱ्या सर्व मानवी सत्तांचा समावेश आहे, ज्यांचे वैशिष्ट्य हिंसा, भौतिकवादाशी असलेली निष्ठा आणि देवाला आव्हान देणारी आत्मभिमानी वृत्ती असे नानाप्रकारचे गुण आहेत (प्रकटीकरण 17–18).
3. देव आपल्या सर्व शत्रूंना पराभूत करेल आणि आपल्या लोकांना पूर्णपणे मुक्त करेल.
जर देवाने पाप्यांना तारण देण्याची बांधिलकी स्वेच्छेने आणि कृपेनं स्वीकारलीच नसती, तर त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होणे म्हणजे सर्वांना दोषी ठरवून मरणदंडास पात्र करून टाकणारी गोष्ट ठरली असती (रोम. 5:12–14). आश्चर्याची गोष्ट म्हणजे, देवाची कृपा अशा जगात येऊन प्रकट झाली आहे जे स्वतःच्या अटींवर स्वायत्त आत्मसिद्धीसाठी पूर्णपणे झटत असते— मग ते फार पूर्वीचे अश्शूरचे साम्राज्य असो, किंवा देवाविरुद्ध आज उभ्या राहिलेल्या इतर कोणत्याही बंडखोरी स्वरूपांत असो.
पापाच्या सामर्थ्याच्या पार्श्वभूमीवर पाहता, न्यायनिवाडा आणि तारण या दोन्ही गोष्टी आनंद करण्यास कारणीभूत ठरतात. जेव्हा दुष्टता आणि ती आचरणात आणणारे लोक पतन पावतात, तेव्हा त्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांनी आनंद करणे हे योग्यच ठरते (नहूम 3:19; प्रकटीकरण 19:1–5). त्याचप्रमाणे, जे देवाचे तारण आनंदाने स्वीकारतात, ते त्यांच्यावर झालेल्या त्याच्या प्रसादाचा आणि दयेचा उत्सव साजरा करतात (नहूम 1:15) आणि त्याचा तारण करण्याचा उद्देश पूर्णपणे सिद्धीस जावा म्हणून उत्कंठेने वाट पाहतात (नहूम 2:2).
“आधीच सुरू झाले आहे, पण अद्याप पूर्णत्वाला पोहोचलेले नाही” अशा शेवटल्या दिवसांच्या अवस्थेत जगत असताना, नहूमचा संदेश विश्वासणाऱ्यांना देवाच्या वचनांवरील विश्वास दृढ राखण्यास आणि या जगात दैवी सत्याला विरोध करणाऱ्या अनेक विसंगतींचे विवेचन करून त्यांना उघडे पाडण्यास बोलावतो. ज्याप्रमाणे नहूमने निनवेच्या मूर्तीपूजक साम्राज्याच्या स्वार्थी आणि आत्म-विनाशकारी स्वभावाचे भंडाफोड केले, त्याचप्रमाणे ख्रिस्ती लोकांनी त्या विविध स्वरूपांचे विवेचन करून ते उघड केले पाहिजे, ज्यात निरनिराळे व्यक्तीविशेष, गट आणि संपूर्ण संस्कृती मानवाला स्वतःचे स्वामी मानतात, देवाच्या अंतर्निहित ज्ञानाकडे पाठ फिरवतात आणि मनुष्य स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःपुरताच, परिपूर्ण आनंद प्राप्त करू शकतो असे मानून देवाचे अधिकार आपल्या ताब्यात घेऊ पाहतात.
शिवाय, नहूम विश्वासणाऱ्यांना त्या नश्वर, तरीही मनुष्याद्वारे “परमसुख दृष्ट्या अंतिम” मानल्या जाणाऱ्या तथाकथित उत्तम गोष्टींची उकल करून त्यांचे बिंग उघडे पाडण्याचे आवाहन करतो, मग त्या गोष्टी भौतिक संपत्ती असोत, सामाजिक मानप्रतिष्ठा असोत, की केवळ नीतिमत्त्वाचा बडेजाव करून स्वतःला बहाल केलेले नैतिक पावित्र्य असो, किंवा सत्तेसाठीची झुंज आणि सत्तेचे केंद्रीकरण असो. या मूर्ती केवळ मनुष्यनिर्मित आहेत; त्या तारण देण्यास किंवा खरी शांती देण्यास असमर्थ असून, आधीच शक्तिहीन ठरलेल्या आहेत (नहूम 1:13).
नहूमच्या पुस्तकाचा शुभवर्तमान-प्रेरित अश्शूर साम्राज्यावरचा टीकात्मक अभ्यास आपल्या वाचकांना देवाचा न्यायनिवाडा आणि तारण या कार्यांच्या प्रकाशात संस्कृतीचे विश्लेषण कसे करावे हे दाखवतो आणि त्यामुळे विश्वासणाऱ्यांना प्रभावी साक्षीसाठी तयार करण्यात मदत करतो. तसेच, जगाच्या वचनांनी आपण मोहित होऊ नये, किंवा “सर्व चांगुलपणाचा उगम” असल्याचा जगाचा हट्टी दावा ऐकून आपली आशा डळमळू नये, यासाठीही तो आपले रक्षण करतो—हा किताब प्रभूने केवळ स्वतःसाठी राखून ठेवला आहे, आणि हेच ते वास्तव आहे की जे त्याला ओळखणाऱ्यांना पूर्णपणे तारण देते व त्यांना खऱ्या अर्थाने तृप्त करते (नहूम 1:7).
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ : याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


