
आळस आणि उद्योगीपणा
16/06/2026स्त्रिया पाळक होऊ शकतात का? पवित्र शास्त्राचे उत्तर
स्त्रिया पाळक किंवा वडील (elders) म्हणून सेवा करू शकतात का, हा प्रश्न अनेक ख्रिस्ती लोकांसाठी अत्यंत जवळचा आणि कुतूहल निर्माण करणारा आहे. या विषयामुळे त्यांच्या मंडळ्यांत वादाचे वारे उठताना, आणि कधी कधी फूट पडतानाही, विश्वासणाऱ्यांनी पाहिले आहे. अशा या गंभीर आणि संवेदनशील विषयाचा विचार करताना, पवित्र शास्त्राकडे वळणे महत्त्वाचे आहे. या वादग्रस्त प्रश्नावर देवाचे वचन कोणता प्रकाश पाडते?
1 तीमथ्य 2:8–15 मध्ये, मंडळीला देवाला संतोषजनक वाटेल अशा रीतीने आपले जीवन सुव्यवस्थित करण्याची गरज आहे, याविषयी प्रेषित पौल स्पष्ट मार्गदर्शन देतो. या पत्रात पौल, सेवाकार्यातील आपला तरुण सहकारी तीमथ्य, याला लिहितो. तीमथ्य त्या काळी इफिसमधील मंडळीची सेवा करीत होता, आणि तो काळ कठीण होता. पाखंडी शिक्षणाची संकटे (1 तीमथ्य 1:3–11; 6:2–10) आणि उपासनेतील गोंधळ (1 तीमथ्य 2:1–15) यांचे त्याला निवारण करावे लागत असे. तसेच मंडळीला तिच्या अधिकार्यांच्या, म्हणजे वडील आणि सेवक (deacons), यांच्या पात्रतेविषयी आणि त्यांच्या कार्याविषयीही स्पष्ट मार्गदर्शनाची गरज होती (1 तीमथ्य 3:1–5:25).
ख्रिस्ती उपासनेतील प्रार्थनेच्या कार्याविषयी तीमथ्याला निर्देश दिल्यानंतर (1 तीमथ्य 2:1–7), पौल देवाच्या सार्वजनिक उपासनेत सहभागी होत असताना पुरुष आणि स्त्रियांना विशिष्ट सल्ला-मसलत देण्याकडे वळतो (1 तीमथ्य 2:8–15). या वचनांमध्ये तो अशी पापे समोर ठेवतो, जी विशेषतः सर्वांसाठीच, मग ती स्त्री असो वा पुरुष, अति त्रासदायक ठरली आहेत. “पुरुषांनी राग व विवाद सोडून” प्रार्थना करावी (1 तीमथ्य 2:8). स्त्रियांनी बाह्य सौंदर्यापेक्षा सुभक्तीला प्राधान्य द्यावे (1 तीमथ्य 2:9–10).
सार्वजनिक उपासनेत स्त्रियांच्या सहभागाशी संबंधित आणखी एक मुद्दा पौल पुढे हाताळतो. तो प्रथम स्त्रियांसाठी देवाच्या पाचारणाची सकारात्मक रूपरेषा मांडतो: “स्त्रीने सर्वस्वी अधीनतेने निमूटपणे शिकावे” (1 तीमथ्य 2:11). प्रेषित पौल हे अधोरेखित करतो की स्त्रियांना मंडळीच्या उपासनेत उपस्थित राहण्याचा आणि पुरुषांच्या बरोबरीने, देवाचे वचन वाचले जात असताना आणि त्याची घोषणा केली जात असताना, ते शिकण्याचा अधिकार आहे. या दृष्टीने, येशूच्या स्त्रीवर्गातील शिष्या सर्व प्रकारे येशूच्या पुरुषवर्गातील शिष्यांच्या समतुल्य आहेत.
त्यानंतर पौल स्त्रियांवर “शिकविण्याची किंवा पुरुषावर धनीपण चालविण्याची” प्रतिबंध घालतो (1 तीमथ्य 2:12). त्याऐवजी, त्यांनी “शांत राहावे.” देवाने त्यांना ज्या कार्यासाठी पाचारण केले आहे, म्हणजेच शांतपणे शिकणारे असणे, त्यात त्यांनी स्वतःला मग्न ठेवावे. वचन 12 मध्ये सांगितलेल्या निषिद्ध प्रयत्नांचा त्यांनी पाठपुरावा करू नये.
या निषिद्ध गोष्टी कोणत्या? पौल दोन गोष्टींचा उल्लेख करतो. पहिली म्हणजे शिकविणे. येथे संदर्भ महत्त्वाचा आहे. पौल स्त्रियांना कोणत्याही आणि सर्व प्रकारच्या शिकविण्याच्या कार्यापासून, अगदी मंडळीतही, प्रतिबंधित करत नाही. उलट, मंडळी सार्वजनिक उपासनेसाठी एकत्र जमलेली असताना, देवाच्या वचनाचे सार्वजनिक उपदेश आणि अध्यापन करण्यास पौल स्त्रियांना मनाई करतो. हे कार्य मंडळीच्या वडिलांचे आहे (पहा 1 तीमथ्य 3:2; 4:11–16). दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांवर सत्ता चालविणे. पुढील अध्यायात, पौल आध्यात्मिक अधिकार मंडळीच्या वडिलांकडे सोपवतो, असे पात्र पुरुष, ज्यांनी स्वतःला आपल्या कुटुंबाचे सक्षम व्यवस्थापक म्हणून सिद्ध केले आहे (पहा 1 तीमथ्य 3:5). म्हणून वचन 12 मधील पौल जो प्रतिबंध घालतो त्याचा सारांश असा मांडता येईल: स्त्रियांना मंडळीत वडिलांचे पद धारण करण्याची, किंवा वडिलांची कार्ये पार पाडण्याची, परवानगी नाही.
वचन 13–14 मध्ये पौल वचन 11–12 मधील आपल्या निर्देशांसाठी कारणे देतो. देवाने आदाम आणि हव्वा यांना ज्या क्रमाने घडविले, त्याची आठवण पौल तीमथ्याला करून देतो: “कारण प्रथम आदाम घडला गेला, नंतर हव्वा” (1 तीमथ्य 2:13). त्यानंतर पौल तीमथ्याला आपले पहिले पालक कोणत्या क्रमाने पापात पडले, त्याची आठवण करून देतो: “आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली.” (1 तीमथ्य 2:14). याचा अर्थ असा नाही की पौल आदामाला पतनाच्या जबाबदारीतून मुक्त करीत आहे. उलट, आदामाचे पाप देवाच्या वचनाच्या स्पष्ट प्रकाशाविरुद्ध होते (पहा उत्पत्ति 2:15). तसेच पौल येथे हव्वा ही काही भोळी किंवा सहज फसणारी व्यक्ती होती, असेही म्हणत नाही. तो फक्त पवित्र शास्त्र जे शिकवते त्याची नोंद घेतो: सर्पाने फसविल्यानंतर हव्वेने निषिद्ध फळ खाल्ले.
1 तीमथ्य 2:13–14 मधील पौलाचे शब्द वचन 11–12 मधील आज्ञांना कसे आधार देतात? ते किमान दोन प्रकारे आधार देतात. पहिले म्हणजे, वचन 12 मध्ये स्त्रियांना देवाच्या मंडळीतील सार्वजनिक उपदेश व अध्यापन, आणि अधिकाराच्या अंमलबजावणीवर जो प्रतिबंध लावला आहे, त्याचे मूळ देवाने मनुष्याला ज्या प्रकारे घडविले त्यात आहे (1 तीमथ्य 2:13). दुसऱ्या शब्दांत, त्या प्रतिबंधाचे मूळ सृष्टीच्या क्रमात आहे. पौलाने लावलेला हा प्रतिबंध इफिसमधील परिस्थितीपुरताच मर्यादित नाही; तसेच तो पहिल्या शतकापुरताही मर्यादित नाही. आणि या प्रतिबंधाला पहिल्या शतकातील एखाद्या यहुदी मनुष्याच्या मर्यादित दृष्टिकोनाचा परिणाम मानणे तर मुळीच योग्य ठरणार नाही. हा प्रतिबंध पुरुष आणि स्त्रियांविषयी देवाने सृष्टीमध्ये प्रस्थापित केलेला क्रम प्रतिबिंबित करतो.
दुसरा आधार हा की, वचन 12 मधील पौलाने लावलेल्या प्रतिबंधाला वचन 14 मध्ये एक सावध करणारा वृत्तांत जोडलेला आहे. हव्वेने “देवासारखे होण्याचा” प्रयत्न केला आणि देवाच्या वचनाची अवज्ञा केली, तेव्हा विपत्ती ओढवली (उत्पत्ति 3:5). देवाने आपल्या कल्याणासाठी जो सुदृढ क्रम प्रस्थापित केला आहे, त्यापासून दूर गेल्याने कधीही चांगले होत नाही. म्हणूनच पौल पुढे सांगतो की, देवाने ज्या गोष्टींची मनाई केली आहे, त्यांचा स्त्रियांनी पाठपुरावा करू नये. देवाने ज्या कार्यासाठी त्यांना पाचारण केले आहे, त्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित करावे. देव बहुतेक स्त्रियांना (परंतु सर्व स्त्रियांना नाही) विवाह आणि अपत्यप्राप्ती यांसाठी पाचारण करतो (1 तीमथ्य 2:15). जेव्हा एखादी विश्वास ठेवणारी स्त्री हे पाचारण “विश्वास, प्रीति व पवित्रता ह्यात संयम राखून” स्वीकारते, तेव्हा देवाने ख्रिस्तामध्ये तिला मुक्तपणे दिलेल्या तारणाची तिला खातरी प्राप्त होऊ शकते.
आज मंडळीत पौलाच्या या शब्दांची आपल्याला गरज आहे. हे शब्द देवाने त्याच्या मंडळीत पुरुष आणि स्त्रियांसाठी घालून दिलेला क्रम, किंवा नमुना, आपल्यासमोर ठेवतात. त्या क्रमापासून विचलित होण्याचा धोका ते आपल्या अंतःकरणावर ठसवतात. परंतु ते मंडळीसाठी केवळ नकारात्मक गोष्टीच मांडत नाहीत. देवाने स्त्रियांना काय असावे आणि काय करावे यासाठी पाचारण केले आहे, याचे ते एक आकर्षक दर्शन सादर करतात. ज्या काळात स्त्रियांना पुरुषांपेक्षा बौद्धिक आणि नैतिकदृष्ट्या कनिष्ठ मानले जाई, त्या काळात पौलाने तीमथ्याला सांगितले की, पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही ख्रिस्ताच्या शाळेत शिकणाऱ्या म्हणून राहण्याचा अधिकार आहे (1 तीमथ्य 2:11). त्यांनी स्वतःला सुभक्तीने सुशोभित केले पाहिजे, केवळ उपासनेसाठी दर आठवड्याला मंडळीत एकत्र येतात तेव्हाच नव्हे (1 तीमथ्य 2:9), तर अपत्यांची काळजी घेण्याच्या दैनंदिन कष्टाच्या कामातही (1 तीमथ्य 2:15). जीवनातील शांत आणि सामान्य प्रसंगांतच देव आपल्या कृपेचे असामान्य हेतू प्रत्यक्षात उतरविण्यास संतोष मानतो. आणि हीच प्रत्येक युगातील देवाच्या सर्व लोकांसाठी चांगली वार्ता आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


