
एस्तेरच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
26/02/2026
पवित्र देवाशी असलेले युद्ध आणि शांतीची स्थापना
05/03/2026सफन्याच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
सफन्या हे पुस्तक गुंतागुंतीच्या उलथापालथींनी, उत्कृष्ट काव्याने, सखोल अभिवचनांनी, आणि कडक इशाऱ्यांनी भरलेले, लक्षणीय रीतीने प्रगल्भ पुस्तक आहे. दक्षिण राज्याच्या अखेरच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर भविष्यवाणी करत असताना, सफन्याचा संदेश प्रामुख्याने परमेश्वर प्रथम यहूदावर बंदिवासाद्वारे जो न्याय आणील (सफन्या 1:4–6), आणि शेवटच्या दिवशी सर्व मानवजातीविरुद्ध सार्वत्रिकरीत्या जो न्याय करील (सफन्या 1:2–3), याविषयी आहे, आणि पुस्तकाचा बहुतेक भाग याच न्यायाने व्यापलेला आहे (सफन्या 1:2–3:8). तथापि, सफन्याचा भर न्यायावर असला, तरी शेवटी तो वाचकाला देवाने आपल्या लोकांच्या तारणासाठी दिलेल्या अभिवचनांतील आशेकडे अग्रसर करतो (सफन्या 3:9–20). सफन्याने दिलेला न्याय आणि आशेचा भविष्यसूचक संदेश तो ज्या प्रकारे उभा करतो, तो अधिक समजून घेण्यासाठी खालील तीन गोष्टी आपल्याला मदत करतात.
1. सफन्याचे पुस्तक जुन्या करारातील आधीच्या पुस्तकांच्या संदर्भांनी समृद्ध आहे.
तुम्हाला जर सफन्याचे पुस्तक समजून घ्यायचे असेल, तर मी देऊ शकणारा सर्वोत्तम सल्ला हा आहे की तुम्ही तुमचे पवित्र शास्त्र नीट जाणून घ्या. एक संदेष्टा या नात्याने सफन्याची सेवा जुन्या करारातील आधीच्या शास्त्रलेखांतील अनेक सूचक संदर्भांनी समृद्ध आहे; आणि हे संदर्भच त्याचा संदेश समजून घेण्याची गुरुकिल्ली ठरतात. पुढील काही उदाहरणे हे स्पष्ट करतात:
- सफन्या 1:2–3 मध्ये आपल्याला उत्पत्ति 1 चा ‘उलट क्रम’ (inversion) पाहायला मिळतो, जिथे सफन्या सृष्टीचा उल्लेख उलट क्रमाने करून न्याय आणि विनाशाचे चित्र उभे करतो. उत्पत्ति 1 मध्ये देवाच्या सर्जनशील कार्यातून सर्व गोष्टींचा प्रारंभ नोंदविला आहे; परंतु सफन्या न्यायाच्या वेळी सर्व गोष्टी ‘झाडून टाकल्या’ जातील अशी भविष्यवाणी करतो. आणि उत्पत्ति 1 चा संदर्भ देत असतानाच, संदेष्टा ‘दुष्टांबरोबर त्यांच्या अडखळण ठरणाऱ्या गोष्टी (मूर्ती) नष्ट केल्या जातील’ या शेवटच्या उल्लेखाद्वारे संदेष्टा त्या विचाराला पुढेही नेतो. मनुष्याची दुष्ट मूर्तिपूजा हाच न्याय ओढवून आणणारा मूळ कारणभूत घटक ठरतो.
- सफन्या 1:9 मध्ये देव अशा लोकांना शिक्षा देण्याविषयी बोलतो जे “उंबरठ्यावरून उडी मारतात.” येथे सफन्या दागोनाच्या मंदिरातील पलिष्टी उपासनेचा संदर्भ घेतो (1 शमुवेल 5:5) आणि देवाचे लोकही त्याच पद्धतीने परमेश्वराची उपासना करीत आहेत, म्हणजेच एकमेव खऱ्या देवाची उपासना आणि मूर्तिपूजक प्रथा यांचे मिश्रण करीत आहेत, असे वर्णन करतो. हा सूचक संदर्भ इस्राएलच्या मिश्र उपासनेला देवाच्या न्यायाचे एक कारण म्हणून उघड करतो; तसेच पुढे येणारा “धन्याचे घर” हा उल्लेख, खोट्या उपासनेमुळे “अन्याय व कपट” यांनी भरलेल्या मंदिराकडेच निर्देश करतो, हेही स्पष्ट करतो.
- सफन्या 2:15 मध्ये अश्शूर म्हणते, “मीच काय ती आहे, दुसरे कोणी नाही”, जे यशया 40–48 मधील त्या विडंबनात्मक ध्रुवपदावरून घेतले आहे, जिथे देव स्वतःच “तो” आहे आणि “दुसरा कोणी नाही” असे म्हणतो (यशया 44:6; 45:5, 6, 14, 18, 21; 46:9 पहा). अश्शूरचे पाप म्हणजे उद्धट आणि देवाची निंदा करणारी आत्मोन्नती आहे, ज्यात ते स्वतःला देवाच्या तुल्य ठरवतात.
- सफन्या 2:4–15 मध्ये, राष्ट्रांविरुद्धचा सफन्याच्या संदेशाचा मोठा भाग उत्पत्ति 10 मधील राष्ट्रांच्या वंशावळीतून घेतलेला आहे.
- सफन्या 3:9–12 मध्ये मुक्ती ही बाबेलच्या (उत्पत्ति 11:1–9) घटनेचे उलट रूप आहे.
वरील हे सर्व आणि इतर अनेक संदर्भ दर्शवतात की सफन्याचे पुस्तक जुन्या कराराच्या इतर अनेक शास्त्रलेखांनी समृद्ध आहे.
2. परमेश्वराचा दिवस हा न्याय आणि पुनर्स्थापनेचा दिवस आहे.
सफन्यामधील अत्यंत महत्त्वाच्या विषयांपैकी एक म्हणजे “परमेश्वराचा दिवस”. हा शब्दसमूह जुन्या करारात सोळा वेळा आढळतो; त्यांपैकी तीन वेळा तो सफन्यामध्ये येतो (सफन्या 1:7, 14). यांशिवाय, इतर शब्दप्रयोगही वाचकाला “परमेश्वराचा दिवस” या नेमक्या भाषेकडे परत घेऊन जातात, उदा., “दिवस” (वीस वेळा संदर्भ), “त्या वेळी” (चार वेळा संदर्भ), किंवा केवळ “तेव्हा” (दोन वेळा संदर्भ), अशा रीतीने परमेश्वराच्या दिवसाचे एकूण एकोणतीस प्रत्यक्ष संदर्भ मिळतात. “परमेश्वराचा दिवस” नेमका काय, याविषयी विद्वान दीर्घकाळ विचारमंथन करीत आले आहेत; मुख्य मते अशी मांडली गेली आहेत की तो धार्मिक विधींचा दिवस आहे, पवित्र युद्धाचा दिवस आहे, ईश्वरी दर्शनाचा दिवस आहे, कराराशी निगडित दिवस आहे, किंवा यांपैकी काहींचे एकत्रित स्वरूप आहे.
सफन्या या चर्चेत भर घालतो, कारण तो या “दिवसाची” अधिक मूलभूत कल्पना आपल्यासमोर ठेवतो. जरी विद्वानांच्या मांडणीतील ती सर्व वैशिष्ट्ये सफन्यामध्ये असली तरी, तो या संकल्पनेला देवाच्या आगमनाची, म्हणजेच देव येतो त्या, अधिक मूलभूत वास्तविकतेच्या रूपाने चित्रित करतो. सफन्यामधील “परमेश्वराचा दिवस” हा तो दिवस आहे, ज्या दिवशी स्वर्गाचा देव आपल्या स्वर्गीय मंदिरातून धार्मिक प्रतिमांच्या चौकटीत स्वतःला “उठवून” कार्यप्रवृत्त करतो (सफन्या 1:7, 9), आपल्या स्वर्गीय सैन्याचा दैवी सेनापती किंवा योद्धा म्हणून येतो (सफन्या 1:7, 14, 16), करारातील शाप व आशीर्वाद अमलात आणतो (सफन्या 1:13, 18; 3:19–20), आणि ईश्वरी वैभवाच्या तेजस्वी दर्शनासह समीप येतो (सफन्या 1:15). सर्वात मूलभूत अर्थाने, परमेश्वराचा दिवस म्हणजे, त्याच्या आगमनाचा दिवस. विश्वासणाऱ्यांसाठी हा धन्य आशेचा दिवस आहे, कारण त्यांना देवाच्या पवित्र पर्वतावर उचलले जाते (सफन्या 3:11) आणि तेथे ते सर्वकाळ सुरक्षित वसतात (सफन्या 3:9–20); परंतु दुष्टांसाठी तो क्रोधाचा भयावह दिवस आहे (सफन्या 1:2–18; 2:4–3:8).
3. नम्रता आणि आत्मगर्व हे मुख्य विषय आहेत.
शेवटी, सफन्यामध्ये “परमेश्वराचा दिवस” हा विषय अभिमानी आणि नम्र यांच्यासाठी भवितव्यांची उलटफेर घडवून आणणाऱ्या त्याच्या प्रमुख ईश्वरशास्त्रीय संकल्पनेशी घट्टपणे जोडलेला आहे. परमेश्वराच्या दिवशी न्यायाचे मुख्य कारण म्हणजे अहंकारी आत्मोन्नती. देवाच्या लोकांविरुद्ध मवाबाने केलेल्या बढाईखोर उपहासाला उत्तर म्हणून त्यांच्याविरुद्ध शापाची घोषणा केल्यानंतर, सफन्या स्पष्टपणे म्हणतो:
‘त्यांनी सेनाधीश परमेश्वराच्या लोकांना तुच्छ मानले व त्यांच्यावर तोरा मिरवला म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यांना हे प्रतिफळ मिळेल.’ (सफन्या 2:10)
अभिमानी लोकांना प्रभूच्या पवित्र डोंगरावरून “काढून टाकले” जाईल (सफन्या 3:11). अभिमान हा केवळ स्वतःवर फुशारकी मारण्यापुरता मर्यादित नसतो, तर त्याच्याशी सुसंगत अशी ईशनिंदा करणारी व बढाईखोर आत्मोन्नतीही त्यात असते. अश्शूर राष्ट्राचे वर्णन एक “आत्मोन्मत्त नगर” असे केले आहे, जे यशया 40–48 मध्ये देवाच्या अस्मितेविषयी आलेले तेच ध्रुवपद, “मी तोच आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही”, स्वतःस लागू करून घेते (सफन्या 2:15). अहंकारी आत्मोन्नती ही ईशनिंदा करणाऱ्या आत्म-स्तुतीतून प्रकट होते. परंतु परमेश्वराच्या दिवशी, जे स्वतःला उंच करतात आणि स्वतःवर गर्व करतात, त्यांना खाली पाडून नम्र केले जाईल.
परंतु सफन्यामधील तारण हा परमेश्वरामध्ये आनंद मानणाऱ्या नम्र लोकांचा गौरव आहे. सफन्या 3:9 मध्ये न्यायाकडून तारणाकडे होणारी झेप ही सर्व राष्ट्रांतील उपासकांना एकत्र करण्यामध्ये दिसते; आणि सफन्या त्यांचे चित्रण “नम्र व गरीब लोक” असे करतो (सफन्या 3:12). ते स्वतःला उंच करीत नाहीत, तर आपल्या तारणासाठी “परमेश्वराच्या नामाचा धावा करतात” (सफन्या 3:9). नम्र लोक स्वतःमध्ये आनंद मानत नाहीत; ते परमेश्वराची उपासना करतात आणि परमेश्वरामध्येच आनंद मानतात (सफन्या 3:14). इतकेच नव्हे, तर देवाच्या प्रेमाचे आणि नम्र लोकांचे गौरव करणाऱ्या त्याच्या कृपेचे एक अद्भुत चित्र म्हणून, सफन्या 3:17 मध्ये परमेश्वर स्वतः नम्र लोकांवर आनंद करतो असे म्हटले आहे!
काही काळासाठी देवाच्या लोकांचे वर्णन “लंगडे” किंवा “हाकून दिलेले” असे केले जाऊ शकते (सफन्या 3:19), ज्यांच्याविरुद्ध राष्ट्रे बढाई मारतात (सफन्या 2:8) आणि ज्यांना लज्जित करतात (सफन्या 3:19), तरी देवाने दिलेले अभिवचन हे आहे की तो नम्र जनांना उंच करील आणि त्यांना “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत लौकिक व गौरव” प्राप्त करून देईल (सफन्या 3:19, 20). खरे पाहता, सफन्या 2:3 मधील मुख्य उपदेश हा आहे की, “नीतिमत्वाचा शोध घ्या; नम्रतेच्या मागे लागा”, जे प्रामुख्याने “परमेश्वराला शोधा” असेच आवाहन आहे.
सारांशरूपात सांगायचे तर, आपण असे म्हणू शकतो की, जुन्या करारातील अन्य ग्रंथांशी असलेल्या बहुविध नातेसंबंधांद्वारे सफन्याचा ईश्वरशास्त्रीय संदेश असा उभा राहतो की, परमेश्वराच्या दिवशी “जो स्वतःला उंच करतो तो नम्र केला जाईल; आणि जो स्वतःला नम्र करतो तो उंच केला जाईल” (मत्तय 23:12).
हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ :तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


