Who Was Samson?
शमशोन कोण होता?
07/04/2026
Who Was Samson?
शमशोन कोण होता?
07/04/2026

पापक्षमेची खातरी म्हणजे काय?

What Is an Assurance of Pardon?

जगातील अनेक अत्यल्प धार्मिक प्रवृत्ती असलेल्या लोकांनाही रोमन कॅथलिक परंपरेतील ही प्रसिद्ध ओळ माहीत आहे : “फादर, मला आशीर्वाद द्या, कारण मी पाप केले आहे.” जेव्हा एखादी धर्मप्रांतक व्यक्ती याजकासमोर खाजगी कबुलीजबाब कक्षात प्रवेश करते तेव्हा उच्चारले जाणारे हे शब्द पापाची वास्तविकता आणि कृपेची गरज या दोन्ही गोष्टी किती आवश्यक आहेत याची अगदी ठळकपणे प्रचिती करून देतात. मग या प्रसंगात पुढे काय होते? कबूल केलेल्या पापांची यादी ऐकून घेतल्यावर तो याजक पश्चात्तापासाठी काही पायऱ्या ठरवून देतो आणि शेवटी क्षमाप्राप्तीची खातरी देतो. प्रोटेस्टंट रिफॉर्म्ड विश्वास देखील पापकबुली आणि क्षमाप्राप्ती यांचे महत्त्व मान्य करतो, परंतु या बाबतीत काही मुख्य फरक स्पष्ट दिसतात.

पहिला फरक हा की, आपण आपले पाप कोणासमोर कबूल करतो. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, “एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.” (1 तीमथ्य 2:5). म्हणून आम्ही असे मानतो की, आपल्या पापांनी निर्माण केलेली दरी भरून काढू शकणारा एकमेव मनुष्य तोच, म्हणजे ख्रिस्तच आहे; कोणताही मानवी याजक किंवा पास्टर नव्हे. आम्ही आपली पापे थेट देवापुढे कबूल करतो, आणि आमचा महान महायाजक ख्रिस्त येशू ह्याच्या योग्यता पुढे ठेवून विनवणी करतो (इब्री लोकांस पत्र 4:14–16).   

दुसरा फरक हा की, पापकबुली कोणत्या ठिकाणी व्हावी, याविषयी आमची समज काय आहे. कबुलीजबाब कक्षाच्या खाजगीपणात जे घडते, ते रिफॉर्म्ड लोक सार्वजनिक उपासनेचा एक मध्यवर्ती घटक म्हणून समोर आणतात. शतकानुशतके रिफॉर्म्ड उपासना-विधींचे एक वैशिष्ट्य म्हणजे “शुद्धीकरण” म्हटलेला एक विभाग. त्याचे एक उदाहरण असे असू शकते : देवाचे वचन वाचले जाते, लोक त्याला प्रतिसाद म्हणून आपली पापे कबूल करतात, आणि मग जे ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवत आलेले आहेत त्यांच्यासाठी पाळक क्षमाप्राप्तीची खातरी जाहीर करतो.

या विधीला आपण सार्वजनिक उपासनेचा भाग का करावा? पापांची कबुली देणे ही अतिशय वैयक्तिक आणि खाजगी बाब वाटू शकते. कदाचित अशा मंडळी-सेवेत तुम्हाला अस्वस्थ वाटले असेल, जिथे गेल्या आठवड्यातील तुमच्या पापांना थेट सामोरे जावे लागते. आज अनेक मंडळ्या ‘नियमशास्त्र’ वाचणे किंवा पापांची कबुली देणे या गोष्टी जाणीवपूर्वक बाजूला सारून दिल्या आहेत, कारण लोकांना संकोच वाटू नये अशी त्यांची इच्छा असते. परंतु रिफॉर्म्ड परंपरा दुसऱ्या मार्गावर ठाम राहिली आहे, आणि त्याचे कारण उपासनेच्या स्वरूपात आहे. 

उपासना ही देवाशी झालेली गाठभेट असते, आणि पापी लोक पवित्र देवाच्या सान्निध्यात येऊ शकत नाहीत. पापकबुली आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडलेल्या नीतिमत्वाची घोषणा ही एक सामर्थ्यवान आठवण करून देते की, सुवार्तेशिवाय उपासना करणे शक्यच नाही. शिवाय, उपासना ख्रिस्ती ओळख घडविण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी अस्तित्वात आहे. ख्रिस्ती म्हणून आपण एकाच वेळी पापी आणि पवित्र आहोत, आणि या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत (1 योहान 1:8-9). स्थापित मंडळीच्या उपासनेत, जेव्हा पाळक ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळालेल्या क्षमेची खातरी जाहीर करतो, तेव्हा तो एक अतिशय हर्षानंदाचा क्षण असतो, आणि तो आपल्यावर ही ओळख खोलवर बिंबवतो की आपण कृपेने तारले गेलेले पापी आहोत, असे लोक जे देवाच्या दृष्टीने निवडलेले आणि मौल्यवान आहेत.  

हा मुद्दा क्षमाप्राप्तीच्या खातरीविषयी रोमन कॅथलिक आणि रिफॉर्म्ड प्रोटेस्टंट दृष्टिकोनातील तिसऱ्या फरकाकडे नेतो : पाळक जेव्हा पापांची क्षमा जाहीर करतो तेव्हा नेमके काय घडते. असे करताना पाळक एखादा हुकूम काढत नसून, पवित्र शास्त्रानुसार जे आधीच सत्य आहे त्याचीच तो केवळ घोषणा करीत असतो. याउलट, रोमन कॅथलिक परंपरेत “पापमुक्ती” (लॅटिन शब्द ‘अॅब्सोल्वेरे’ पासून आलेला, ज्याचा अर्थ “मुक्त करणे”) ही याजकाची अशी कृती मानली जाते की, ज्यात तो एखाद्या व्यक्तीला तिच्या पापाच्या दोषातून प्रत्यक्षपणे मुक्त करतो. परंतु पाप क्षमा करण्याचा अधिकार मनुष्यांमध्ये कोणालाही नाही (मार्क 2:7), जरी पाप क्षमा झाल्याची घोषणा करण्याचा अधिकार दिलेला आहे (प्रेषितांची कृत्ये 13:38). रिफॉर्म्ड प्रोटेस्टंट उपासना सेवेतील या निर्णायक क्षणी पाळक देवाचा प्रतिनिधी म्हणून उभा असतो, तो देवाच्या जागी बसत नाही; आणि त्याच्या मुखातून आपण आपल्या क्षमाशील व दयाळू देवाचे शब्द ऐकतो: “ह्यास्तव जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना आता दंडाज्ञा नाही” (रोम 8:1). म्हणूनच अनेक रिफॉर्म्ड मंडळ्यांमध्ये क्षमाप्राप्तीची खातरी जाहीर करताना, केवळ पवित्र शास्त्रातील असा शास्त्रभाग वाचला जातो की, जो सुवार्तेतील क्षमा आणि आशा स्पष्टपणे व्यक्त करतो. देवाचे वचन आणि त्याचे अभिवचन यांतूनच आपल्याला क्षमाप्राप्तीची खातरी मिळते.   

हे लक्षात घेता, क्षमाप्राप्तीची खातरी जाहीर करणे हा रिफॉर्म्ड मंडळीच्या उपासना-विधीतील उच्च बिंदूंपैकी एक आहे. पाप आपल्याला खाली पाडते, परंतु सुवार्ता आपल्याला वर धरून उचलते (पहा स्तोत्रसंहिता 32:3-5). ती आपल्या आशेचे इंधन आणि आपल्या आज्ञापालनाचे सामर्थ्य आहे. उपासना ही जो “सर्व कृपेचा देव” (1 पेत्र 5:10) त्याच्याशी गाठभेट होण्याची वेळ आहे, असा देव जो अपात्र बंडखोरांकडे आपला हात पुढे करतो, आणि जो दावीदाच्या शब्दांत, “माझे मस्तक उंच करणारा” होतो (स्तोत्रसंहिता 3:3). तो असा देव आहे जो “मंदक्रोध, आणि ज्याची दया व सत्य विपुल आहे” (निर्गम 34:6). सार्वजनिक उपासनेत त्याचे अंतःकरण पूर्णपणे प्रकट होते, आणि कदाचित विशेषतः क्षमाप्राप्तीची खातरी जाहीर करताना ते अधिकच स्पष्टपणे दिसते. 

जे आधीच ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत, त्यांची क्षमा पाळकाने ती जाहीर करण्याच्या आधीच झालेली असते. त्या क्षणी आपल्यामध्ये किंवा आपल्यामध्ये आणि देवामध्ये वस्तुनिष्ठपणे काहीही बदलत नाही. परंतु जरी आपल्याला आधीच क्षमा झालेली असली, तरी आपण ती गोष्ट अनेकदा विसरतो, आणि त्यातून शंका व अवज्ञा निर्माण होते. म्हणूनच, क्षमाप्राप्तीची खातरी ही आपण देवाचे लोक म्हणून कोण आहोत याची आवश्यक आठवण करून देते: “ते तुम्ही पूर्वी ‘लोक नव्हता,’ आता तर ‘देवाचे लोक आहात; तुम्हांला दया मिळाली नव्हती,’ आता तर ‘दया मिळाली आहे.” (1 पेत्र 2:10).

हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

जोनाथन क्रूझ
जोनाथन क्रूझ
रेव्हरंड जोनाथन लँड्री क्रूझ हे कालामाझू, मिशिगन येथील कम्युनिटी प्रेस्बिटेरियन चर्चचे पाळक आहेत, जिथे ते आपल्या पत्नी आणि मुलांसह राहतात. त्यांनी पन्नासहून अधिक स्तोत्रे आणि ते हिम्न्स ऑफ डिवोशन, द ख्रिश्चन’स ट्रू आयडेंटिटी आणि द कॅरेक्टर ऑफ ख्राइस्ट यांसह अनेक पुस्तके लिहिली आहेत.