
पवित्रतेविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
26/03/2026
रूथ कोण होती?
02/04/2026मोशेविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 5 गोष्टी
मोशे हे पवित्र शास्त्रामधील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. त्याच्याविषयी तुम्हाला कदाचित माहीत नसतील अशा 5 गोष्टी पुढे दिल्या आहेत:
1. मोशे तीन भावंडांमध्ये सर्वात धाकटा होता.
त्याची बहीण मिर्याम ही वयाने त्याच्यापेक्षा इतकी मोठी होती की बाळ मोशेचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी ती लक्ष ठेवू शकली, आणि नंतर फारोच्या कन्येकडे मध्यस्थीही करू शकली (निर्गम 2:1–10). त्याचा भाऊ अहरोन हा त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता (गणना 33:39 आणि अनुवाद 34:6 यांची तुलना करा).
2. मोशेचे आयुष्य प्रत्येकी 40 वर्षांच्या 3 कालखंडांत विभागले गेले होते.
निर्गम 2 मध्ये याचा उल्लेख नसला, तरी प्रेषितांची कृत्ये 7:23 आपल्याला सांगते की मोशेने जेव्हा मिसरी पुरुषाला जीवे मारले तेव्हा तो 40 वर्षांचा होता. प्रेषितांची कृत्ये 7:30 आपल्याला सांगते की देवाने जळत्या झुडपात मोशेला दर्शन देण्यापूर्वी त्याने अरण्यात मेंढरे चारण्यात 40 वर्षे घालवली. त्यानंतर, अनुवाद 34:6 आपल्याला सांगते की मोशेचा मृत्यू झाला तेव्हा तो 120 वर्षांचा होता. म्हणून मोशेने 40 वर्षे मिसरमध्ये, 40 वर्षे अरण्यात मेंढरे राखण्यात, आणि 40 वर्षे अरण्यात इस्राएली लोकांचे नेतृत्व करण्यात घालवली.
3. मोशेने एका कूशी स्त्रीशी लग्न केले (गणना 12:1).
आपल्याला माहीत आहे की त्याने मिद्यानी याजकाची कन्या सिप्पोरा हिच्याशी विवाह केला होता (निर्गम 2:16, 21). पण गणना 12 मध्ये उल्लेख केलेली कूशी पत्नी सिप्पोराच होती का? ऑगस्टिन आणि कॅल्विन यांसारख्या काही शास्त्रपंडितांनी सिप्पोरा आणि कूशी पत्नी ही एकच स्त्री होती, असा दृष्टिकोन मांडला आहे. इतरांच्या मते, ‘कूश’ हा शब्द बहुधा इथिओपियाकडे निर्देश करीत असल्यामुळे ती कूशी स्त्री दुसरी पत्नी असावी. पवित्र शास्त्राने स्वतः या विषयावर अधिक प्रकाश टाकणे उचित मानलेले नसल्यामुळे, हा प्रश्न आपण अनिर्णितच ठेवणे योग्य आहे.
4. मोशे “पृथ्वीवरील सर्व माणसांपेक्षा फार लीन होता” (गणना 12:3).
4. मोशे “पृथ्वीवरील सर्व माणसांपेक्षा फार लीन होता” (गणना 12:3).
हे कथन, जे कदाचित स्वतः मोशेनेच लिहिले असावे, विसंगत वाटते. एखादा लीन किंवा नम्र मनुष्य स्वतःच्या लीनतेविषयी योग्यरीत्या लिहू शकतो काय? समीक्षक विद्वानांनी या वक्तव्याला मोशेने हे लिहिले नसल्याचे लक्षण मानले आहे. परंतु हे नीट समजून घेतले, तर हे वक्तव्य संदर्भाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक ठरते. मिर्याम आणि अहरोन यांनी मोशेच्या नेतृत्वाच्या अधिकारावर आक्षेप उपस्थित केला होता. संतापाने वा कटुतेने उत्तर देण्याऐवजी, मोशेने देवाला आपल्या वतीने बोलू दिले. ‘काईल आणि डेलिट्श’ यांच्या भाष्यानुसार, “तो सर्व माणसांपेक्षा अत्यंत लीन असल्यामुळे, आपल्यावरील हा हल्ला तो शांतपणे त्या सर्वज्ञ आणि नीतिमान न्यायाधीशाकडे सोपवू शकला, ज्याने त्याला पाचारण केले होते आणि त्याच्या पदासाठी पात्र ठरवले होते.”
5. ज्या डोंगरावर येशूचे रूपांतर झाले तेथे मोशे आणि एलीया त्याच्यासोबत प्रकट झाले (मत्तय 17:1–8; मार्क 9:2–8; लूक 9:28–36).
जुन्या करारातील बाकीच्या थोर व्यक्तींऐवजी मोशे आणि एलीया हे दोघेच येशूसोबत का प्रकट झाले, हा वादाचा विषय आहे. काहीजण असा दृष्टिकोन घेतात की मोशे आणि एलीया हे अनुक्रमे नियमशास्त्र आणि संदेष्टे यांचे प्रतिनिधित्व करतात. वैयक्तिक रूपात ते दोघे एकत्रितपणे संपूर्ण जुना करार याचे प्रतिनिधित्व करतात. इतर असा दृष्टिकोन घेतात की ते जुना करारातील चमत्कारांच्या दोन मुख्य कालखंडांचे प्रतिनिधित्व करतात. माझे स्वतःचे मत असे आहे की मोशे आणि एलीया हे जुना करारातील असे दोन पुरुष होते ज्यांनी सीनाय पर्वतावर प्रभूची भेट घेतली होती. म्हणूनच रूपांतरणाच्या वेळी त्यांनी प्रभूची भेट घेणे योग्यच ठरते, आणि त्याद्वारे त्याची मशीहा म्हणून ओळख दृढपणे अधोरेखित होते.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


