दानियेलाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
05/02/2026
3 Things You Should Know about James
याकोबाच्या पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
12/02/2026
दानियेलाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
05/02/2026
3 Things You Should Know about James
याकोबाच्या पत्राविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी
12/02/2026

यिर्मयाच्या पुस्तकाविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा 3 गोष्टी

3 Things You Should Know about Jeremiah

यिर्मया हे पवित्र शास्त्रातील वाचण्यास सर्वांत कठीण आणि आव्हानात्मक पुस्तकांपैकी एक आहे. शब्दसंख्येच्या दृष्टीने पाहिले, तर हे संपूर्ण पवित्र शास्त्रातील सर्वांत मोठे पुस्तक आहे. ते काव्यात्मक प्रतिमा आणि वृत्तांत यांच्यामध्ये, अनेकदा कोणतीही पूर्वसूचना न देता, सतत ये-जा करत राहते आणि त्याची मांडणी कालक्रमानुसारही नाही. त्यातील बहुतांश भाग कठोर न्याय आणि भयावह पाप याविषयी आहे, आणि आशेची मंद किरणे क्वचित दिसून येतात. म्हणून हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाचकांना अनेकदा गोंधळल्यासारखे आणि चकित झाल्यासारखे वाटते.

परंतु तरी, देवाने हे पुस्तक आपल्याला धीर आणि प्रोत्साहन देण्यासाठीच दिले आहे (रोमकरांस 15:4). आपण हे वाचताना तीन गोष्टी मनात ठेवल्या, तर हे आव्हानात्मक पुस्तक आपल्या हाती देताना देवाची कशी अद्वितीय बुद्धिमत्ता आणि कसे खोल प्रेम कार्यरत आहे, हे आपण ओळखू लागतो.

1. या पुस्तकाचा मुख्य विषय — न्यायातून साधली जाणारी पुनर्स्थापना.

आपल्या स्वरूपात अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी, यिर्मयाचे संपूर्ण पुस्तक शेवटी दोनच प्रमुख विषयांचे विवेचन करते: न्याय आणि पुनर्स्थापना. या पुस्तकाचे मुख्य वचन या दोन्ही विषयांवर स्पष्ट प्रकाश टाकते: परमेश्वराने यिर्मयाला “पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.” (यिर्मया 1:10). पहिली चार क्रियापदे न्यायाशी संबंधित आहेत (उपटणे, विध्वंस, नासधूस आणि पाडून टाकणे), तर शेवटची दोन पुनर्स्थापनेशी संबंधित आहेत (बांधणे आणि लागवड करणे).

न्यायाचे हे उतारे प्रामुख्याने ख्रिस्तपूर्व 586 मध्ये बाबेलच्या लोकांकडून यरुशलेमच्या झालेल्या पाडावाकडे निर्देश करतात. ही भयंकर घटना यहूदाने केलेल्या भयावह पापाचा न्याय्य परिणाम होता, हे ठळकपणे दाखविणे हा परमेश्वराचा संकल्प आहे. अनुवाद 28 मधील करारातील शापांकडे केलेल्या असंख्य सूचक उल्लेखांमधून हे स्पष्ट होते की जेव्हा त्याचे लोक त्याचा विश्वासघात करतात, तेव्हा तो काय करील असे त्याने पूर्वी सांगितले होते, त्याच वचनाशी तो आता निष्ठावान राहात आहे. खरे तर, तो आपल्या लोकांबरोबर अत्यंत धीराने वागलेला आहे.

यिर्मयाच्या सेवाकाळात यहूदाचा पाडाव ही अटळ ठरलेली गोष्ट बनली. कितीही पश्चात्ताप केला, कितीही प्रार्थना केली तरी तो टाळता येऊ शकत नव्हता. म्हणूनच परमेश्वर यिर्मयाला लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, असे बजाऊन सांगतो (यिर्मया 7:16; 11:14). त्यामुळे यहूदासमोर उरलेला एकमेव मार्ग म्हणजे आपला होत असलेला न्याय मान्य करणे, ज्यात वचनदत्त देशातून बंदिवासात जाणे  समाविष्ट होते (यिर्मया 21:8–10).

परंतु यिर्मयाच्या संदेशातील सर्वांत विस्मयकारक भाग हा आहे की तोच परमेश्वर, ज्याने त्यांच्यावर कडक न्याय आणला, याचबरोबर शाप उलटवण्याचा (यिर्मया 31:28) आणि आपल्या लोकांचे आरोग्य पुन्हा बहाल करण्याचा संकल्पही करतो (यिर्मया 30:12–17; पाहा अनुवाद 32:39). यहूदाला केवळ हद्दपारीपूर्वीच्या ‘जैसे थे’ स्थितीत बहाल करणे इतकेच तो करणार नाही; उलट, तो एक नवी देणगी देणार आहे, म्हणजे नवा करार, ज्यात देव त्या पापाच्या प्रश्नाला थेट आणि निर्णायकरीत्या सोडवील, ज्यामुळे पूर्वीचे बंदिवास ओढवले होते. आता परमेश्वर आपले नियमशास्त्र आपल्या लोकांच्या अंतःकरणावर लिहील (यिर्मया 31:31–34) आणि त्यांना विश्वासात स्थिर राहण्याचे सामर्थ्य देईल (यिर्मया 32:40). पाप यापुढे त्यांच्यावर प्रभुत्व गाजवणार नाही.

यिर्मयाचे पुस्तक यहूदाला त्यांच्या कथेचा हा भीषण आणि उत्कर्षबिंदू ठरलेल्या शेवटाचे योग्य रीतीने आकलन करून समजून घेता यावा म्हणून दिले गेले होते. त्यांचे राष्ट्र प्रत्येक स्तरावर—राजा, मंदिर, देश, करार—मुळासकट उपटले जात असतानाही, यिर्मया दाखवतो की परमेश्वराचा त्या सर्वाच्या मागे एक तारणदायी हेतू होता. त्याने या छायारूपी देणग्या काढून घेतल्या, जेणेकरून अंतिम, युगांताच्या देणग्यांसाठी मार्ग तयार व्हावा, ज्या कधीही लोप पावणार नाहीत. इस्राएलच्या गाथेचा खरा शेवट हा शेवटी क्रोधात नव्हे, तर कृपा आणि गौरवात होणार आहे.

2. या पुस्तकात काही ठिकाणी वक्ता बदलतो, परंतु त्या बदलाची नोंद करून देणारी प्रस्तावना किंवा सूचना दिलेली नसते. 

यिर्मयाचे काव्यात्मक भाग समजणे वाचकांना अनेकदा कठीण जाते. हे समृद्ध उतारे तेव्हाच सुस्पष्ट अर्थपूर्ण होऊ लागतात, जेव्हा आपण ओळखतो की यिर्मया येथे परमेश्वर, स्वतः यिर्मया आणि लोक यांच्यातील संवादांचे चित्रण करीत आहे. कधी कधी तो “सियोन कन्या” या शैलीबद्ध प्रतिमेतून लोकांचे प्रतिनिधित्व करतो (यिर्मया 10:19–20), जिथे यरुशलेम एका स्त्रीच्या रूपात उभी केली जाते.

या नाट्यमय संवादांत बहुधा कोणतीही आगाऊ सूचना न देता वक्ता बदलतो. उदाहरणार्थ, यिर्मया 8:18–9:3 या उताऱ्यात वक्ता पाच वेळा बदलतो. म्हणूनच आपल्याला मजकुरातील सूचनांवरून आवाजातील हा बदल ओळखायला शिकावे लागते. तुम्ही जर स्वतःला वारंवार विचारले, “या वचनात नेमका कोण बोलतो आहे?” आणि वक्ता पुन्हा पुन्हा बदलू शकतो, ही जाणीव जपली, तर कठीण उतारेही समजू लागतील. यासाठी भाष्यग्रंथ (Commentaries) आपली मोठी मदत करू शकतात. 

3. हे पुस्तक येशू ख्रिस्त आणि मंडळीकडे निर्देश करते.

प्रभु येशू, जो यिर्मयाच्या ग्रंथाचा खरा आणि  अंतिम लेखक आहे (1 पेत्र 1:11), तो स्वतः जाहीर करतो की हे पुस्तक शेवटी त्याच्याचविषयी आहे (लूक 24:25–27). आणि जर यिर्मयाचा ग्रंथ येशूविषयी असेल, तर तो त्याच्याशी एकरूप असलेल्या त्याच्या मंडळीविषयीही बोलतो.

आपण जेव्हा यिर्मया वाचतो, तेव्हा येशूशी जीवनदायी भेट घडेल, अशी आपण अपेक्षा केली पाहिजे; आणि त्याचबरोबर स्वतःविषयीचे जीवनदायी शब्दही आपण ऐकू, अशी तयारी ठेवावी. प्रभु येशू हा दाविदाच्या वंशातील तो नीतिमत्तेचा अंकुर आहे, ज्याला “परमेश्वर आमचे नीतिमत्व” असे नाव दिले जाईल (यिर्मया 23:5–6). परंतु हेच नाव त्याच्या मंडळीला देखील दिले गेले आहे (यिर्मया 33:16). देवाचे नीतिमत्व केवळ त्याच्या सनातन राजामध्येच नव्हे, तर त्याच्या लोकांमध्येही ओतप्रोत प्रवाहत राहील.

येशूच्या येण्याबाबतच्या या थेट भविष्यवाण्या म्हणजे केवळ प्रारंभ आहे. यहूदा आणि इतर राष्ट्रांवर जो न्याय आला — ज्याला संदेष्टे “परमेश्वराचा दिवस” म्हणतात — तो अंतिम न्यायदिवसाची केवळ एक लहानशी पूर्वझलक आहे; आणि त्या अंतिम न्यायाकडे प्रभु येशूच्या वधस्तंभावरील मृत्यूने बोट दाखवले आहे (येशू मरण पावला तेव्हा पृथ्वी हादरणे आणि आकाश काळवंडणे ही “परमेश्वराच्या दिवसाची” चित्रेच आहेत, मत्तय 27:45, 51). म्हणून, जेव्हा यिर्मया यहूदा आणि राष्ट्रांवरील परमेश्वराच्या न्यायाविषयी बोलतो, तेव्हा आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे अर्थगर्भ महत्त्व अधिक सुस्पष्टपणे ओळखू शकतो. आणि त्याचप्रमाणे, यिर्मया पुनर्स्थापनेचे जे समृद्ध वर्णन करतो (यिर्मया 30–33), ते देवाच्या त्या सनातन राज्याकडे निर्देश करते, जे येशूच्या पुनरुत्थानाद्वारे आले आहे, जरी त्याची पूर्ण आणि अंतिम पूर्तता अद्याप बाकी आहे.

अशा प्रकारे, यिर्मयाचा ग्रंथ आपल्या कथेची सुद्धा साक्ष देतो. ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा यिर्मया ज्या न्यायाविषयी बोलतो त्याची अंतिम पूर्तता होईल; आणि जुन्या सृष्टीवर झालेला तो न्याय आपल्याला त्या सनातन पुनर्स्थापनेकडे घेऊन जाईल, ज्याची भविष्यवाणी यिर्मयाने केली होती. म्हणूनच यिर्मयाचा ग्रंथ प्रत्येक युगातील वाचकांसाठी सतत लाभदायक आणि मार्गदर्शक ठरतो.

1. यिर्मया 10:19–21 मध्ये “सियोन कन्या” स्वतःवर येऊन पडलेल्या आपत्तीविषयी विलाप करते. अधिक माहितीसाठी पाहा: मॅथ्यू एच. पॅटन, जेरमाया, झॉन्डरव्हन एक्झिजेटिकल कमेंटरी ऑफ द ओल्ड टेस्टामेंट (ग्रँड रॅपिड्स, झॉन्डरव्हन: लवकरच प्रकाशित होणार).

हा लेख “पवित्र शास्त्रातील प्रत्येक ग्रंथ :याविषयी तुम्हाला माहीत असाव्यात अशा तीन गोष्टी” या मालिकेचा एक भाग आहे..


हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.

मॅथ्यू एच. पॅटन
मॅथ्यू एच. पॅटन
डॉ. मॅथ्यू एच. पॅटन हे वॅंडालिया, ओहायो येथील कव्हनंट प्रेस्बिटेरियन चर्चचे पाळक आहेत. ते बेसिक्स ऑफ हिब्रू डिस्कोर्स: अ गाईड टू वर्किंग विथ हिब्रू प्रोझ अँड पोएट्री या पुस्तकाचे सहलेखक असून ड्यूटेरोनॉमी: अ १२(12)-वीक स्टडी या पुस्तकाचे लेखक आहेत