
गौरवाचा ध्यास
10/03/2026येशूप्रमाणे विचार करणे
काही वर्षांपूर्वी, अमेरिकेतील एका प्रमुख ईश्वरशास्त्रीय सेमिनरीमध्ये झालेल्या एका दीक्षांत-समारंभाच्या अनुषंगाने मला मुख्य भाषण देण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्या भाषणात मी पवित्र शास्त्राचे अर्थविवेचन करताना तर्कशास्त्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका काय आहे, याविषयी बोललो, आणि सेमिनरींनी त्यांच्या अनिवार्य अभ्यासक्रमात तर्कशास्त्राचे अभ्यासक्रम समाविष्ट करावेत, अशी कळकळीची विनंतीही मी केली. जवळजवळ कोणत्याही सेमिनरीच्या अभ्यासक्रमात, विद्यार्थ्यांना पवित्र शास्त्राच्या मूळ भाषा, म्हणजे इब्री आणि ग्रीक, यांचे काही प्रमाणात अध्ययन करणे आवश्यक असते. त्यांना मजकुराची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहण्याचे प्रशिक्षण दिले जाते, आणि अर्थविवेचनाची मूलभूत तत्त्वेही ते शिकतात. देवाच्या वचनाचे उत्तम कारभारी होण्यासाठी ही सर्व महत्त्वाची आणि मौल्यवान कौशल्ये आहेत. तथापि, पवित्र शास्त्राचे अर्थविवेचन करताना चुका होण्याचे मुख्य कारण वाचकाला इब्री भाषेचे ज्ञान नसणे किंवा ज्या परिस्थितीत पवित्र शास्त्रामधील पुस्तक लिहिले गेले त्याचे ज्ञान नसणे हे नसते. पवित्र शास्त्र समजून घेताना होणाऱ्या चुकांचे प्रथम क्रमांकाचे कारण म्हणजे वचनातून काढलेले ‘अवैध निष्कर्ष’ हे होय. माझा असा ठाम विश्वास आहे की, जर पवित्र शास्त्राचे अर्थविवेचन करणारे लोक तर्कशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांमध्ये अधिक कुशल असते, तर असे दोषपूर्ण निष्कर्ष काढले जाण्याची शक्यता कमी झाली असती.
मी ज्या प्रकारच्या दोषपूर्ण निष्कर्षांबद्दल बोलत आहे त्याचे मी एक उदाहरण देतो. मला वाटत नाही की देवाच्या सार्वभौम निवडीच्या प्रश्नावर माझी कधीही अशी चर्चा झाली असेल, ज्यात कोणीतरी योहान 3:16 चा उल्लेख करून असे म्हटले नसेल की, “परंतु पवित्र शास्त्र असे म्हणत नाही का की, ‘देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे’?” पवित्र शास्त्र तसेच म्हणते, याशी मी ताबडतोब सहमत होतो. आपण त्या सत्याचे तार्किक विधानांत रूपांतर केले, तर आपण निर्विवादपणे असे म्हणू शकतो की जे विश्वास ठेवतात त्यां सर्वांना सार्वकालिक जीवन मिळेल, आणि ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवन आहे, अशा कोणाचाही नाश होणार नाही, कारण विश्वासाच्या परिणामांच्या दृष्टीने ‘नाश होणे’ आणि ‘सार्वकालिक जीवन’ हे पूर्णपणे परस्परविरोधी आहेत. परंतु या शास्त्रभागात, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची मानवी क्षमता याविषयी काहीच सांगितलेले नाही; कोण विश्वास ठेवेल, याविषयीही तो काहीच सांगत नाही. येशू म्हणतो, “ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही” (योहान 6:44). येथे आपल्याकडे क्षमतेचे वर्णन करणारे एक सार्वत्रिक नकारात्मक विधान आहे: जोपर्यंत देव स्वतः एक ठराविक अट पूर्ण करत नाही, तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीमध्ये येशूकडे येण्याची क्षमता नसतेच. तरीही, योहान 3:16 च्या प्रकाशात लोक ही गोष्ट विसरून जातात, कारण त्या वचनात विश्वासासाठीची कोणतीही पूर्वअट नमूदच केलेली नाही. त्यामुळे, पवित्र शास्त्रामधील सर्वांत प्रसिद्ध शास्त्रभागांपैकी एक असलेले योहान 3:16 ह्या वचनाचा, दोषपूर्ण निष्कर्ष आणि चुकीचा अर्थ लावून, दररोज, अगदी नियमितपणे, आणि पद्धतशीररित्या विपर्यास केला जातो.
असे अशास्त्रीय आणि बिनबुडाचे निष्कर्ष का निघतात? शास्त्रीय ख्रिस्ती ईश्वरशास्त्र, विशेषतः रिफॉर्मड ईश्वरशास्त्र, पापाच्या ‘नोएटिक’ परिणामांविषयी बोलते. ‘नोएटिक’ हा इंग्रजी शब्द ग्रीक ‘नूस’ (nous) या शब्दापासून आलेला असून त्याचा अनुवाद बहुधा “मन” असा केला जातो. म्हणून पापाचे ‘नोएटिक’ परिणाम म्हणजे मानवी पतनामुळे मानवी बुद्धीवर झालेले परिणाम. मानवी स्वभावाच्या भ्रष्टतेमुळे संपूर्ण मानवी व्यक्तिमत्व, आपल्या सर्व क्षमतांसह, उद्ध्वस्त झाले आहे. पापामुळे आपली शरीरे मरतात. मानवी इच्छा ही नैतिक बंधनाच्या अवस्थेत आहे; ती अंतःकरणातील दुष्ट अभिलाषा आणि वासना यांच्या कैदेत अडकलेली आहे. त्याचप्रमाणे आपली मने देखील पतित झाली आहेत आणि आपली विचार करण्याची क्षमता पतनामुळे गंभीररित्या दुर्बल झाली आहे. माझ्या मते, पतनापूर्वी आदामाचा बुद्ध्यांक (IQ) सर्व मोजमापांच्या पलीकडे असावा. बागेची निगा राखत असताना तो असे अशास्त्रीय आणि बिनबुडाचे निष्कर्ष काढीत असेल, असे मला वाटत नाही. उलट, त्याचे मन तीक्ष्ण व सूक्ष्मभेदी होते. परंतु जेव्हा त्याचे पतन झाले तेव्हा त्याने आपला हा सद्गुण गमावला, आणि त्याच्याबरोबर आपणही तो गमावला.
तथापि आपण पतित आहोत, याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे विचार-शक्तीच उरलेली नाही. आपल्या सर्वांकडून चुका होण्याची शक्यता असते, परंतु आपण सुव्यवस्थित, तार्किक आणि सुसंगत पद्धतीने युक्तिवाद करायला शिकू शकतो. ख्रिस्ती लोकांनी अत्यंत सुसंगतपणे आणि स्पष्टतेने विचार करावा अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच, शिस्तीचा भाग म्हणून, तर्कशास्त्राच्या प्राथमिक तत्त्वांचा अभ्यास करणे आणि त्यावर प्रभुत्व मिळवणे हे आपल्या हिताचे आहे, जेणेकरून आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने, आपल्या विचारांवर पापाने केलेल्या विदारक आघातांवर काही प्रमाणात मात करू शकू.
मला क्षणभरही असे वाटत नाही की आपल्यात पाप आहे तोपर्यंत, आपल्यापैकी कोणीही आपल्या तर्कशक्तीत कधी परिपूर्ण होईल. आपण जिवंत आहोत तोपर्यंत पाप आपल्याला देवाच्या नियमाविषयी पूर्वग्रहदूषित करते, आणि देवाच्या सत्याविषयी निर्माण होणाऱ्या या मूलभूत विकृतींवर मात करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. परंतु जर आपण देवावर केवळ आपल्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण शक्तीनेच नव्हे, तर पूर्ण मनानेही (म्हणजे वैचारिक बुद्धीने) प्रीती करीत असू (मार्क 12:30), तर आपण आपल्या मनाला प्रशिक्षित करण्याच्या प्रयत्नांत काटेकोर राहू.
होय, पापात पतन होण्यापूर्वी आदामाचे मन (वैचारिक तत्त्व) तीक्ष्ण होते. परंतु माझा असा विश्वास आहे की ख्रिस्ताच्या मनात प्रकट झाल्यासारखा सुदृढ विचार जगाने कधीही अनुभवला नाही. आपल्या प्रभूच्या परिपूर्ण मनुष्यत्वाचा एक भाग हा होता, की त्याने कधीही अवैध निष्कर्ष काढला नाही. ज्या तर्कसूत्रांनी निष्कर्षास आधार दिलेला नाही, अशा निष्कर्षावर तो कधीही घाईने पोहोचला नाही. त्याचे विचार स्फटिकासारखे स्वच्छ आणि सुसंगत होते. आपल्याला सर्व गोष्टींमध्ये आपल्या प्रभूचे अनुकरण करण्याचे आवाहन केले आहे, ज्यामध्ये त्याच्या विचारांचाही समावेश आहे. म्हणून, आपल्या संपूर्ण मनाने त्याच्यावर प्रीती करणे ही आपल्या जीवनातील मुख्य आणि गंभीर आस्थेचा परिपाठ बनवा.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


