
पवित्र देवाशी असलेले युद्ध आणि शांतीची स्थापना
05/03/2026
येशूप्रमाणे विचार करणे
12/03/2026गौरवाचा ध्यास
गौरवाचा ध्यास अत्यंत प्रेरक असतो. गौरव आवाक्यात आहे याची जाणीव झाली, की आम्ही कितीतरी अधिक प्रयत्न करतो किंवा किती अधिक वेगाने धावतो. गौरवाची एक संधी मिळावी म्हणून आम्ही वैयक्तिक सुख-सुविधांचा त्याग करण्यासही तयार असतो. “कष्टाविना फळ नाही” हेच जणू वारंवार स्वतःला बजावत आपण आणखी पुढे झेप घेण्यासाठी झगडतो. आपले जीवन कसेही करून सार्थ ठरावे अशीच आपली ओढ असते. जे खरोखरच मोलाचे आहे त्याचा ध्यास घेतल्याबद्दल आपल्याला दाद मिळावी, आपला गौरव व्हावा, अशी इच्छा आपल्यात असते.
गौरव प्राप्तीसाठी खोलवर लागलेली ही तहान आपल्यात का आहे, यामागे कारण आहे. देवाच्या वचनात आपण पाहतो की मुळात आपली निर्मिती ही गौरवासाठीच झाली आहे. त्याने आपले शरीर घडवले आणि आपल्यात जीवनाचा श्वास फुंकला, यासाठी की आपल्याला त्याच्या पवित्रतेच्या वैभवाची ओळख व्हावी आणि त्याच्याविषयी आदरयुक्त भयाने थक्क व्हावे. देवाच्या चांगुलपणाचा आपल्या अंतःकरणावर आणि मनावर इतका ठसा उमटावा, की आपण सहजपणे अगदी नैसर्गिकरीत्या त्याची उपासना करावी आणि त्याच्या आज्ञेत राहावे, असा त्याचा हेतू होता. याद्वारे आपण देवाचा अद्भुत गौरव प्रतिबिंबित करावा, अशी त्याची योजना होती.
परंतु, आपल्या सभोवताली पाहा. हे जग पवित्रतेच्या गौरवाने प्रकाशत आहे का? कदाचित तुमच्या लक्षात आले असेल की पापाने आपल्या जगाला कसे विद्रूप केले आहे. येथे दुःख, कटुता, कपट आणि मरण आहे. जर आपली निर्मिती देवाचा गौरव ओळखण्यासाठी झाली होती, तर मग नेमके चुकले कुठे?
याचे उत्तर देवाचे वचन थेट आपल्या अंतःकरणाकडे निर्देश करून देते. आपण देवावर विसंबून राहावे आणि त्याचे गौरव करावे यासाठीच आपली निर्मिती झाली होती; परंतु आपण त्याऐवजी स्वतःचाच गौरव शोधण्याचा आग्रह धरतो. आपण देवाची इच्छा बाजूला सारून स्वतःच्या इच्छा पुढे करतो, आणि स्वतःसाठी नाव कमावण्याच्या मागे लागतो. पवित्र शास्त्र यालाच ‘पाप’ म्हणते; आणि हे आपल्या विषयी देवाने ठरविलेल्या उद्देशाविरुद्ध उठलेले बंड आहे. पाप आपल्याला देवाच्या महानतेऐवजी आपल्याच क्षुद्रपणात समाधान शोधण्यास भुरळ घालते. आपण चुकीच्या पद्धतीने आपली ओळख, आपले कार्य किंवा आपली स्वप्ने यात शाश्वत गौरव शोधण्याचा प्रयत्न करतो. परंतु पुन्हा पुन्हा आपण रिक्त व असमाधानीच उरतो. तसेच आपल्याला हेही कळते की आपण दोषी आहोत, कारण आपले पाप देवाच्या नजरेतून सुटत नाही. तो नीतिमान न्यायाधीश आहे. त्याचे सत्य सोडून स्वतःचे सत्य उभे करण्याचा प्रयत्न करताना आपण अपराधी ठरतो. या पापाची दंडाज्ञा पवित्र शास्त्रात स्पष्टपणे सांगितली आहे: मरण आणि देवापासून सार्वकालिक विभक्तता.
परंतु सुवार्तेचा संदेश हा गौरवशाली शुभवर्तमान आहे. पवित्र शास्त्र सांगते, “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान 3:16). येशू ख्रिस्त, देवाचा परिपूर्ण पुत्र, याने मनुष्यरूप धारण केले, तरी तो मनुष्याच्या पापाने कलुषित झाला नाही. तो मनुष्यांमध्ये राहिला, पण त्यांच्या आज्ञाभंगात कधीही समभागी झाला नाही. देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून आणि देवाच्या नावाचा गौरव करण्यापासून तो कधीही ढळला नाही. त्याने देवाचा गौरव परिपूर्णपणे प्रतिबिंबित केला.
पवित्र शास्त्र सांगते की येशू ख्रिस्त “मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसेपर्यंत” आज्ञेत राहिला (फिलिप्पैकरांस 2:8). त्याचे आज्ञापालन त्याला वधस्तंभापर्यंत घेऊन गेले. असे का?
उत्तर हे आहे: येशू ख्रिस्ताने आम्हांवर असलेली दंडाज्ञा स्वतःवर घेतली. जे मरण आमचे ते मरण त्याने सोसले यासाठी की आम्ही जिवंत राहावे. जी शिक्षा आम्हाला भोगायला हवी होती, ती त्याने सोसली. आम्हाला अपराधांची क्षमा मिळावी म्हणून त्याने आमची पापे स्वतःवर घेतली. देवासमोर आमचा स्वीकार व्हावा म्हणून त्याने स्वतःचे जीवन दिले. आपण आपली पापे कबूल करावीत आणि त्याच्यामध्ये मुक्ती शोधावी म्हणून तो आम्हांसाठी मेला. ही अद्भुत आणि गौरवशाली वार्ता आहे. त्याच्या मरणानंतर तीन दिवसांनी येशू ख्रिस्त पुन्हा उठला. दंडाज्ञा, मरण, आणि पाप यांवर विजय मिळवून तो पुनरुत्थित झाला.
पवित्र शास्त्र ही सुवार्ता अशा शब्दांत मांडते: “म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही” (रोमकरांस 8:1). येशूमध्ये आम्हाला क्षमा, आशा, शांती, आणि समाधान ही दाने मिळतात. येशूमध्ये देवाच्या उपस्थितीत आमचा सहज स्वीकार होतो, आणि आपण त्याच्या प्रीतीचे व पवित्रतेचे सौंदर्य नव्याने ओळखतो. हेच तारण आहे. हेच खरोखर गौरवशाली आहे. हीच सुवार्ता आहे.
प्रिय मित्रा, तू आपली पापे कबूल करून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहेस का? त्याचे मरण आणि पुनरुत्थान हाच आपल्या तारणाचा मार्ग आहे, यावर तू विश्वास ठेवण्यास तयार आहेस का? आज तुझे तारण होऊ शकते. तो तुला क्षमा करील.
आमची प्रार्थना हीच आहे की तू त्याच्यावर विश्वास ठेवावा, आणि त्याचा गौरव खरोखर तृप्त करतो, हे तुला प्रत्यक्ष अनुभवास यावे.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


