
येशूप्रमाणे विचार करणे
12/03/2026उपदेश व शिक्षण : एक तुलनात्मक विवेचन
गेल्या अनेक वर्षांपासून, सोळाव्या शतकातील प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनच्या काळात अंधारात दडपलेली सुवार्ता पुन्हा उजेडात आणण्यात ज्यांचा मोठा वाटा होता अशा मार्टिन ल्यूथर आणि जॉन कॅल्विन यांसारख्या पुरुषांविषयीचे माझे कौतुक मी कधीही लपवून ठेवले नाही. त्यांची उत्तुंग बुद्धिमत्ता आणि अनेक संकटांमध्येही निर्भीडपणे उभे राहण्याची त्यांची शक्ती, याविषयी मी थक्क होतो. पवित्र शास्त्रीय सत्याविषयीची त्यांची प्रीती हे अनुकरण करण्यासारखे एक उदाहरण आहे. विशेषतः त्यांच्या पाळकीय आदर्शाबद्दल मी कृतज्ञ आहे. हे दोन्ही पुरुष त्यांच्या काळात “कीर्तिवंत” होते, परंतु त्यांच्यापैकी कोणीही अनुयायांची चळवळ मजबूत करण्यासाठी युरोपभर प्रवास करण्यात आपली वर्षे घालवली नाहीत. त्याऐवजी, देवाच्या वचनाचा संदेश आणि शिक्षण देणे हेच आपले मुख्य पाचारण मानून, त्यांनी स्वतःला त्यासाठी वाहून घेतले. हे दोघेही अथक उपदेशक होते —ल्यूथर जर्मनीतील विटेनबर्ग येथे, आणि कॅल्विन स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे. त्यांनी देवाच्या वचनाच्या सेवेला गांभीर्याने घेतले, म्हणून जेव्हा ते उपदेशकाच्या कार्याबद्दल बोलतात, तेव्हा मी बारकाईने लक्ष देतो.
दहा वर्षांहून अधिक काळापूर्वी, मला मार्टिन ल्यूथर यांच्या प्रवचनाविषयीच्या दृष्टिकोनावर एक व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते; आणि त्या कामासाठी तयारी करताना, उपदेशक म्हणून माझ्या स्वतःच्या सेवेसाठी ती तयारी किती अमूल्य ठरली, हे मला प्रकर्षाने जाणवले. पुढे मला हेही समजले की, प्रवचनाविषयी ल्यूथर यांनी जे काही सांगितले, ते केवळ पाळकासाठीच नव्हे, तर संपूर्ण मंडळीसाठी होते; आणि त्यांच्या शब्दांचे सामयिकपण आजही किती आश्चर्यकारकरीत्या टिकून आहे, हे पाहून मी विस्मयचकित होतो.
ल्यूथरच्या लेखनात आपल्याला वारंवार आढळणारा एक आग्रह म्हणजे उपदेशक हा “शिकवण्यास समर्थ” असावा. अनेक दृष्टींनी पाहता, यात काही अद्भुत अशी नवीन अंतर्दृष्टी नाही, कारण ते केवळ नवीन करारात मंडळीच्या वडिलांसाठी नमूद केलेल्या पात्रतेचीच पुनर्मांडणी करीत आहेत (1 तीमथ्य 3:2). तरीही, आज आपण आपल्या उपदेशकांकडून ज्या अपेक्षा ठेवतो त्या पाहता, ल्यूथरचे शब्द, जे पवित्र शास्त्रीय प्रकटीकरणाचाच प्रतिध्वनी आहेत, ते पुन्हा नव्याने ऐकण्याची गरज आहे. सेवकाचे मुख्य कार्य ‘शिक्षण देणे’ हे आहे, ही संकल्पना आज मंडळीमधून जवळजवळ लुप्त झाली आहे. जेव्हा आपण आपल्या मंडळ्यांत सेवकांना पाचारण करतो, तेव्हा आपण बहुतेकदा ते कुशल प्रशासक असावेत, निधी उभारण्यात पटाईत असावेत, आणि आयोजनात निपुण असावेत, अशी अपेक्षा करतो. निश्चितच, त्यांना काही ईश्वरशास्त्र आणि पवित्र शास्त्र माहीत असावे, ही आपली इच्छा असते; पण देवाच्या गोष्टी मंडळीला शिकवण्यासाठी ते सुसज्ज असावेत, याला आपण प्राधान्य देत नाही. प्रशासकीय कामेच अधिक महत्त्वाची मानली जातात.
स्वतः येशूने जे प्रारूप मांडले होते, ते हे नाही. त्याच्या पुनरुत्थानानंतर पेत्राबरोबर झालेली येशूची भेट तुम्हाला आठवत असेल. पेत्राने येशूचा उघडपणे तीन वेळा इन्कार केला होता, आणि येशूने त्या प्रेषिताची पुनर्स्थापना करताना त्याला तीनदा “माझ्या मेंढरांना चार” असे सांगितले (योहान 21:15-19). अधिक व्यापकपणे पाहता, हेच पाचारण मंडळीच्या वडिलांना आणि सेवकांना दिले जाते, कारण जगभरातील मंडळ्यांत एकत्र जमणारे देवाचे लोक येशूचे आहेत. ते त्याची मेंढरे आहेत. आणि ज्याचीही दीक्षा होते असा प्रत्येक सेवक, त्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी देवाकडून पवित्र केला जातो आणि त्याच्यावर ती जबाबदारी सोपवली जाते. म्हणूनच आपण या सेवेचा उल्लेख “पाळकीय सेवा” असा करतो, कारण सेवकांना ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी घेण्याचे पाचारण दिलेले आहे. पाळक हे ख्रिस्ताचे ‘कनिष्ठ मेंढपाळ’ आहेत (कारण मुख्य मेंढपाळ तर तोच आहे ); आणि कोणता मेंढपाळ असा असेल, जो आपल्या मेंढरांकडे इतके दुर्लक्ष करील की त्यांना चारण्यासाठी तो कधीही वेळ देणार नाही, किंवा कष्ट घेणार नाही? आपल्या प्रभूच्या मेंढरांचे भरण-पोषण प्रामुख्याने शिक्षणाद्वारे होते.
सामान्यतः आपण ‘संदेश’ (उपदेश) आणि “शिक्षण” यांत भेद करतो. प्रवचनात बोध, स्पष्टीकरण, ताकीद, प्रोत्साहन आणि सांत्वन यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो, तर शिक्षण म्हणजे विविध विषयांतील आशयाविषयी माहिती आणि सूचना यांचे हस्तांतरण होय. तथापि व्यावहारिकदृष्ट्या पाहता, या दोन्हींत मोठ्या प्रमाणावर परस्पर-साम्य आढळते. प्रवचनाने आशय पोहोचविलाच पाहिजे, आणि त्यात शिक्षणाचा समावेशही असला पाहिजे; तसेच देवाच्या गोष्टी लोकांना शिकविणे हे तटस्थ रीतीने करता येत नाही, तर ख्रिस्ताच्या वचनाकडे लक्ष देऊन ते पाळावे व आज्ञाधारक राहावे, यासाठी त्यांच्या ठायी जागृती निर्माण करून त्यांच्या अंतःकरणात ज्वाला पेटवणे आवश्यक असते. देवाच्या लोकांना उपदेशही आवश्यक आहे आणि शिक्षणही आवश्यक आहे; आणि आठवड्यातून केवळ वीस मिनिटांची सूचना व बोध इतक्यावर त्यांची गरज भागत नाही. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना आठवड्यातून एकदाच कधीही चारणार नाही; म्हणूनच ल्यूथर विटेनबर्गच्या लोकांना जवळजवळ रोज शिकवत असत आणि कॅल्विन देखील जिनिव्हामध्ये तसेच करत असत. आज आपल्या काळात नेमक्या त्या पद्धतींचे अनुसरण करण्याचे मी आवाहन करीत नाही, पण विश्वासातील आपल्या पूर्वजांच्या कार्यात दिसून येणाऱ्या नियमित शिक्षण-सेवेतील काही अंश तरी मंडळीला पुन्हा प्राप्त व्हायला पाहिजे, याविषयी मला खातरी आहे. शक्य असेल तितक्या प्रमाणात, मंडळ्यांनी देवाचे वचन प्रवचनाद्वारे आणि शिक्षणाद्वारे ऐकण्यासाठी अनेक संधी निर्माण केल्या पाहिजेत. रविवार संध्याकाळची उपासना, आठवड्याच्या मधल्या सभा, बाइबल-वर्ग, संडे स्कूल, गृह-बाइबल अभ्यास इत्यादी गोष्टी सामान्य लोकांना आठवड्यातून अनेक वेळा देवाच्या वचनाद्वारे पोषण मिळविण्याच्या संधी देतात. शक्य असेल तितक्या प्रमाणात, सामान्य लोकांनी पवित्र शास्त्रातील सखोल सत्यांचे शिक्षण देणाऱ्या उपलब्ध संधींचा लाभ घेतला पाहिजे.
मी हे केवळ उपक्रम राबवण्यासाठी उपक्रम तयार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सांगत नाही, आणि मंडळीच्या सदस्यांवर किंवा मंडळीच्या सेवकवर्गावर ते वाहू शकणार नाहीत असे ओझे टाकावे, अशीही माझी इच्छा नाही. पण इतिहास आपल्याला हे दाखवतो की मंडळीने पाहिलेले पुनरुज्जीवन आणि सुधारणा यांचे महान कालखंड देवाच्या वचनाच्या वारंवार, सातत्यपूर्ण आणि स्पष्ट उपदेशाच्या सोबतीनेच घडले आहेत. पवित्र आत्म्याने आपल्या मंडळ्यांत आणि आपल्या देशात नवचैतन्याची चळवळ पेटवावी, अशी आपली इच्छा असेल, तर त्यासाठी पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण देण्यास वचनबद्ध असलेले उपदेशक आवश्यक आहेत; आणि देवाचे वचन आपल्याला चारण्यासाठी मेंढपाळ शोधणारे, तसेच उपलब्ध असलेल्या बाइबल-सम्मत शिक्षणाच्या संधींचा पूर्ण उपयोग करून घेणारे सामान्य लोकही आवश्यक आहेत.
हा लेख मूळतः लिगोनियर मिनिस्ट्रीजच्या ब्लॉगमध्ये प्रकाशित झाला होता.


